स्त्री भ्रूण हत्या

आज मी तुम्हाला कुणा एका मुलीची गोष्ट सांगणार नाही, नाव नसलेल्या अशा करोडो मुली या देशात रोज मारल्या जातात तसेच गर्भात अजूनही हत्या चालू आहे. राजरोसपणे ते खुनी सज्जन माणसाचा बुरखा पांघरून वावरत असतात आपल्या अवती-भवती आपण विचारही करू शकणार नाही. मुली गर्भातच मारून टाकण्यासाठी खुनाच्या एकाहून एक भयंकर पद्धती वापरल्या जातात.. देशात काही ठिकाणी जन्मलेल्या मुलींच्या गळ्यावर बाजेचा पाय ठेवला जातो आणि त्या बाजेवर चक्क जन्मदात्या आईला बसवलं जातं. ऐकून विश्वास बसत नाही ना !............पण या घटना घडलेल्या आहेत. एवढे क्रूर माणसं या जगात आहेत. आधुनिक काळातील रमाबाई रानडे, राजमाता जिजाऊ, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, झाशीची राणी या स्त्रियांचा वारसा मिळालेला आपला देश आहे. त्यांनी दिलेल्या शिक्षण व संरक्षणाचे धडे आपण इतक्या लवकर कसे विसरलो!................ आपल्या समाजात स्त्री व पुरुषांची समानता जर बिघडली तर त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागणार आहे याचा आपण उघड्या डोळ्यांनी नीट विचार करायलाच हवा. “अवकाश यानातून अंतरीक्ष यानात जाणा-या कल्पना चावला व सुनिता विल्यम्स यांना हीच मानवंदना आहे काय?”          

                 
  

"मुलगी झाली हो'' असे म्हणून मुलींची हत्या करणे ही एक चिंतेची बाब आहे. आध्यात्मिक,सांस्कृतिक,औद्योगिक सर्व बाबतीत आघाडीवर असलेल्या आपल्या भारत देशामध्ये अशा घटना घडाव्यात यासारखे दुसरे दुर्दैव कोणते?  खेड्यापाड्यात शहरी भागात सुशिक्षित व अशिक्षित कुटुंबामध्ये मुलगा जन्माला यावा असे वाटत असते.
पुरोगामी म्हणवला जाणारा हा महाराष्ट्र जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांचा वारसा सांगणारा हा महाराष्ट्र स्त्री भ्रूण हत्येत खूप पुढे आहे............मग काय आता झाले ............आईला मुलगी नको असते की, जन्मदात्याला मुलीचा बाप होणे आवडत नाही अशी कोणती मजबूरी असते की स्त्रीसुद्धा हे पाप करायला तयार होते. आज स्त्रीभ्रूण हत्या हा एक चिंतेचा मुद्दा बनत चालला आहे महाराष्ट्रात बीड जिल्ह्याप्रमाणे आता मुंबईतही अशा हत्या होत आहेत. मुलगी असेल तर गर्भपात समीकरण होत चालले आहे .

“सत्य मेव जयते”
मागील काही कालावधीत अमीर खानच्या बहुचर्चित "सत्यमेव जयते" या कार्यक्रमात या सामाजिक विषयाला दिलेलं महत्व हे समाजातील सर्व स्तरावर पोहचले .............खरं तर या कार्यक्रमामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला एवढचं...! कारण या विषयावर पूर्वीपासूनच जागृतीच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम सुरुच आहे. लेक वाचवा अशी आंदोलनही झाली. या विषयाचं गांभिर्य, स्त्री भ्रुण हत्या केली जात असताना होणारा मातेचा कोंडमारा आणि वैद्यकीय क्षेत्रातली अपप्रवृती यावरही प्रकाश टाकण्यात आल्यानं हा विषय चर्चेत आला.
का हवा आहे मुलगा ?
1) मुलगा वंशाचा दिवा असतो.
2) एक मुलगी पाठोपाठ अनेक मुली होण्याची भीती.      
3) लग्नामध्ये कायदा असूनही मुलीला हुंडा द्यावा लागतो खूप खर्च होतो.
4) मुलीच्या शिक्षणावर केलेला खर्च वाया जातो, तिच्या शिक्षणाचा आपल्याला काही  
    फायदा नसतो.
5) मुलगा हा म्हातारपणाची काठी असतो.                                        
6) मुलगा उत्पन्नाचे साधन असतो.
शोधायला गेले तर असे अनेक करणे आपल्याला मिळतील.

राज्यातील मुला-मुलींचे प्रमाण                                  

देशात स्त्री गर्भाच्या हत्येचे प्रमाण पंजाबात सर्वात जास्त असल्याचे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडाच्या अहवालात (युएनपीएफ) नमूद केले आहे. मुलगी म्हणजे संकट मानण्याच्या मनोवृत्तीतून तिची गर्भातच हत्या करण्याची पद्धत पंजाब मध्ये असल्याचे अहवालात स्पष्ट होते. शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुलींची हत्या होण्याचे प्रमाण जास्त आहे.  स्त्रीगर्भ नको या मानसिकतेतून राजस्थानात मुलींचे प्रमाण घटत चालले असून २००१ च्या जनगणनेनुसार अल्वर जिल्ह्यात प्रति एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ८८८ आहे. मागच्या दशकामध्ये सुमारे १२ लाख स्त्री-भ्रूण हत्येची प्रकरणं घडली आहेत. देशातील लिंग-गुणोत्तर प्रमाण कमालीचे घटत चालले आहे. दशकभरापूर्वी १००० मुलांमागे ९२७ मुली असे लिंग-गुणोत्तर होते, ज्यात घसरण होऊन १००० मुलांमागे ९१४ मुली अशा धोकादायक आकड्यावर येऊन हे लिंग-गुणोत्तर स्थिरावले आहे. यापूर्वी आश्चर्यकारकरित्या १००० मुलांमागे ९४५ मुली असे लिंग गुणोत्तर होते. सध्या असलेले स्त्री-पुरुष विषमता प्रमाण अनेक सामाजिक समस्यांना जन्माला घालणार आहे. त्याची सुरुवातही कधीची झाली आहे याने सर्वात जास्त अराजकताच माजणार आहे.

सोनोग्राफी सेंटर काळाची गरज की मुलींचा कर्दनकाळ........?

स्त्रीच्या गर्भात असणारे बालक मुलगा आहे कि मुलगी आहे कळविल्यावर कायद्याने समंत एखादे कारण निवडून गर्भात केला जातो.  अल्ट्रासोनोग्राफी सारख्या टेक्निकल साहित्याचा वापर करून हानिकारकरित्या केल्या जाणा-या गर्भपातामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी गर्भपाताचा कायदा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी Act-१९७१ पासून भारतात लागू करण्यात आला आहे.  या कायद्याचा गैरफायदा घेवून काही वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीच्या मदतीने लोक स्त्रीभ्रूण हत्या करून घेतात. महाराष्ट्र बीड, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्येची प्रकाराने राज्यभर गाजली आहेतच. स्त्री-भ्रूण हत्या प्रकरणी यापूर्वीच केंद्र आणि राज्य सरकार यांनी कायदे केले आहेत.  जेव्हा सरकारने आपली कार्यवाहीची मोहीम आणखी तीव्र केली तेव्हा आणखी प्रकाराने उजेडात आले. स्त्री-भ्रूण हत्या करण्यासाठी अनेक डॉक्टर यांनी त्यांची दुकाने थाटली आहेत की हजार रुपयाच्या मोबदल्यात गर्भपात करण्याचा हा धंदा राजरोस सूरू आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात २५० च्या वर सोनोग्राफी सेंटर आहेत यावरून महाराष्ट्रच विचार केला तर ह्या सोनोग्राफी सेंटरची संख्या आणि तिथं होत असलेले प्रकार याची व्याप्ती लक्षात येते..
अभिनव उपक्रम
स्त्री गर्भाच्या हत्येचे प्रमाण रोखण्यासाठी राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यात एक अभिनव उपक्रम राबविला जात आहे. सामुदायिक विवाह चळवळीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था बरोबर “ मास्य मेवान शिक्षा विकास संस्थांना या बिगर सहकारी संघटनेच्या पुढाकारामुळे स्त्रीगर्भ वाचविणारा हा क्रांतिकारी उपक्रम राबविला जात आहे.  या सर्व विवाहात मुलींची हत्या न करण्याची शपथ नवदांपात्याकडून घेतली जाते.  जग न पाहता जगाचा निरोप घेण्यास भाग पाडणा-या या समाजाला शिकवण म्हणून हा उपक्रम खूप महत्वाचा आहे. स्त्री गर्भाच्या हत्येसंदर्भात जनसामान्यांमध्ये अगदी खेड्यापाड्यात, वस्तीत, प्राथमिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा विविध योजना मार्फत जागृती होणे आवश्यक आहे. यासाठी या जिल्ह्यात प्रत्येक विवाहात होणा-या सात फे-यानंतर स्त्री गर्भाच्या म्हणजेच मुलींच्या रक्षणासाठी अथवा फेरा नवदांपात्याकडून घातला जातो हा फेरा म्हणजे मुलींच्या गर्भीची जपवणूक करण्याचे संबधित दांपात्य एकमेकांना वचन देतात.
का नको असते मुलगी ?
मुलगी म्हणजे डोक्याला ताप हि मानसिकता अद्याप संपलेली नाही. हुंड्यासाठी होणारा छळ, ठराविक काळात मुलींची घ्यावी लागणारी काळजी या आगामी काळात होणा-या त्रासाला घाबराण्याबरोबर आणखी कारणामुळे लोक मुलीला जन्माला घालण्याचे टाळत आहेत. मुलगी हे परक्याचे धन म्हणून तिच्या वाढण्यावर , शिक्षणावर होणारा खर्च वायफळ जाणार आहे हि समाजाची एक मानसिकता तयार झाली आहे. समाजात फक्त मुलगी झाली म्हणून, हुंड्याच्या कारणामुळे सर्वात जास्त घटस्फोट वाढताना दिसून येत आहे.
शेतकरी व मजूर आत्महत्या, हुंडाबळी किंवा स्त्रीभ्रूण हत्या हे एकाच माळेतील तीन मणी आहेत त्यांना वेगवेगळे मोजमाप लावल्यास एकाही प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही अथवा कायम स्वरूपी तोडगा सापडणार नाही तसेच जोपर्यत हुंडा देणे घेणे थांबत नाही तोपर्यत हुंडाबळीही जातच राहणार आणि शेतकऱ्याच्या कर्जबाजारी होणे कधी संपणार नाही आणि आत्महत्या ही थांबणार नाहीत.....................................?
आज घडीला नुसते मुलांचे वाढते प्रमाण आणि मुलींची घटती संख्या याची आकडेवारी प्रसिध्द करून किंवा मुलींचा जन्म कसा जरूरीचा आहे यावर प्रकाश टाकून काही फायदा नाही. खर तर हि सर्व आराखडे फक्त कागदावरच असतात आणि वास्तव वेगळेच असते. आज खरी गरज आहे ती शेतकर्याचे जीवनमान सुधारण्याची आणि कमी होत चाललेल्या सरासरी शेतीमध्येही जास्तीत जास्त पीक कसे घेता येईल आणि शेतकरी कसा सधन होईल हे बघण्याची. तरच तो घरात येणा-या “लक्ष्मीचे” दोन्ही हातानी स्वागतच करेल. आज जर आपण समाजाचे निरीक्षण केले तर समाजातील ८०% मुली ह्या आपल्या आई-वडिलांना संभाळतांना दिसून येतात मग मुलाचा हट्ट का?
स्त्री भ्रूण हत्येवरील उपाय
आजच्या परिस्थितीचा विचार केला तर स्त्रियांचे कर्तुत्व मोठे असल्याचे दिसत आहे असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही ज्याचे स्त्रियांनी नेत्तुत्व स्विकारलेले नाही. अगदी इयत्ता १० वी, इयत्ता १२ वीच्या परीक्षा बरोबर स्पर्धा परीक्षेतही मुली कुठेच कमी पडत नाही असे असताना मुली नको म्हणणारे आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत. त्याची जाणीव त्यांना आलेलीच नाही. रूढी आणि परंपरेला चिकटून बसलेल्या समाजरुपी या दिमाखदार रथाला आता वेगळे करण्याची गरज आहे. समाज जस-जसा पुढे जाईल त्या प्रमाणे येणारी आव्हाने पेलत त्याने नाविन्यपूर्णतेचा पण स्विकाराव हे त्याला कळायला हवे आहे. समाजातील विविध सामाजिक संस्था यांनी समाजातील गरीब घरातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे. तसेच समाजाने यांना प्रोत्साहन द्यायला हवे आहे.
यावर विशिष्ट प्रकारचे कायदे असायला हवे आणि त्याचे पालन करण्यासाठी देशातील नागरिकाला जनजागृती बरोबर सक्तीचे असावे. त्याच बरोबर कायद्याचे उलंघन करणा-या, भ्रूणहत्या अपराध करिता शिक्षा दिली गेली पाहिजे. वैद्यकीय सेवेतील कोणीही जर हा अपराध केला तर त्याचे परवाना रद्द करण्याची तरतूद करण्यात यावी. नवीन समाजातील जोडप्यांना योग्य दिशा देण्यासाठी विविध शिबिरे व जनजागृती मोहीम राबविली पाहिजे.
शासकीय योजना
1. बेटी बचाव, बेटी पढाओ
2. मनोधैर्य योजना
3. माझी कन्या भाग्यश्री
4. सुकन्या योजना
5 .विविध शिष्यवृत्या 
या सर्व योजना ग्रामीण भागापर्यत पोहचता आहेत का? याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे कारण या योजना पण स्त्री-भ्रूण हत्येपासून कोणाल तरी वाचवू शकता.

“माणसाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा’, ‘देशसेवा हीच खरी ईश्वर सेवा”

अशी वाक्ये केवळ पुस्तकातच राहिली आहेत. ती आपण सर्वांनी जोपर्यत स्वत:च्या घरापासून आमलात आणत नाही, तो पर्यत या वाक्यांना अर्थ प्राप्त होणार नाही.


                                                                        लेखन 
           प्रल्हाद हंकारे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: